TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 20 जुलै 2021 – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठी संधी आहे, त्यामुळे स्वबळावर लढाईसाठी मंजुरी दिलीय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्य प्रभारी एस.के. पाटील आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तिन्ही नेत्यांत सुमारे दीड तास बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे.

यावेळी नाना पटोले यांनी स्वबळावर का निवडणूक लढवली पाहिजे, याबद्दल भूमिका मांडली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात काँग्रेसला काम करण्याची मोठी संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस स्वबळावर लढल्यास फायदा होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वबळाला मंजुरी दिलीय. राहुल गांधी यांच्यासोबत सर्व चर्चा झालीय.

काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व ऊर्जा मंत्री नितीन राऊत दिल्लीमध्ये दाखल झाले होते. पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर चर्चा झाली होती. मात्र, या भेटीवेळी नाना पटोले हजर नव्हते. त्यानंतर नाना पटोले दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यांना राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे नाना पटोले यांचे वजन आणखी वाढलं आहे.

मध्यंतरीच्या काळात नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सुद्धा आपला पक्ष वाढवण्यासाठी मोहिम हाती घेतलीय. शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान सुरू केलं आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केलाय.

खुद्द शरद पवार यांनी नाना पटोले यांची स्वबळाची मागणी ही रास्त असून प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हटलं होतं. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार की समन्वयाचा मार्ग निवडणार? हे येणाऱ्या काळात समजेल.