उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल आणि सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठं लावायचं? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मित्रपक्ष काँग्रेसला सवाल केला आहे.
काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळय़ांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे. पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाला काही सवाल केले. ”मी पंजाब आणि राष्ट्रहिताचेच बोलत होतो, पण त्यावर काँग्र्रेसने मला ‘नोटीस’ देऊन काय साध्य केले?” हा त्यांचा मुख्य सवाल आहे. काँग्रेसने माझा राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाखड करतात.