राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या वेळी दिवाळीसाठी जवळपास १ हजार ५०० जादा गाड्या सोडणार आहे. या गाड्या २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील विविध भागात धावतील. (MSRTC planned to run more buses during Diwali Vacation)
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांनाही सुट्टी असते. त्यामुळे विद्यार्थी, अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता ST महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १४९४ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.
मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत २९ सप्टेंबर रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. औरंगाबाद प्रदेशातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील.
आरक्षणासाठी एसटी अँप आणि संकेतस्थळाचा वापर करा:
ST बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करता येईल.
एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.