TOD Marathi

भारताची खाण्यापिण्याची उपासमार! पाकिस्तान, आफ्रिकन देशही भारताच्या पुढे…

संबंधित बातम्या

No Post Found

नवी दिल्ली : भारत हा आशिया खंडातील एक विकसनशील देश समजला जातो. जीडीपीच्या बाबतीतही देशानं अनेकांना पिछाडीवर सोडलं आहे.  मात्र याच गाजावाजा होणाऱ्या भारताची मात्र एका बाबतीत नाचक्की झाली आहे.  जागतिक उपासमार निर्देशांक अर्थात ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये ( Global Hunger Index India Rank ) भारत नजिकच्या देशांपेक्षाही पीछाडीवर असल्याचं नव्या अहवालात समोर आलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये भारताला 29.1 गुण देण्यात आले आहेत. या गुणांची गोळाबेरीज करता भारताचा या यादीत 121 देशांच्या यादीत 107 वा क्रमांक लागला आहे. उपासमारीची ही अत्यंत निम्न श्रेणी असून ही समस्या भारतात दिवसागणिक गंभीर होत चालल्याचंही ही निदर्शक आहे. विशेष म्हणजे आपण ज्यांना अविकसीत राष्ट्र म्हणतो असे लहानगे देशही याबाबतीत भारताच्या  पुढे आहेत.

 

श्रीलंका (64), म्यानमार (71), नेपाळ (81), बांग्लादेश (84) आणि पाकिस्तान (99) हे देश भारताच्या पुढे आहेत. दक्षिण आशियाचा विचार करता भारताच्या मागे फक्त अफगाणिस्तान (109) आहे. त्यामुळे सरकारनं उपासमारीच्या समस्येकडे आता गांभिर्यानं पाहावं, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.

दरम्यान मागील अहवालानुसार भारताचा या यादीत 101 वा क्रमांक होता. मात्र चालू अहवालात यात तब्बल सहा अंकांची घसरण आढळून आली आहे. आधीच रुपयाच्या तुलनेत डॉलर वधारतो आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचा मोठा गाजावाज केला जात आहे. मात्र लोकांच्यातील आर्थिक दरी आणखी वाढत चालल्यानं विकासाचा हा फक्त फुगवलेला फुगाच असल्याचं या अहवालामुळे समोर आलं आहे.