TOD Marathi

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टींनी (Raju Shetty) पुण्यात साखर आयुक्तालयावर आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस ऊसवाहतूक बंद केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही प्रमूख मागण्या सरकार समोर मांडल्या होत्या, आता राजू शेट्टींच्या लढ्याला अखेर यश आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमूख मागण्या काय होत्या?
1) उसाला एक रकमी एफआरपी मिळावी.
2) उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी.
3) वाहतूकदारांची सुरू असलेली फसवणूक थांबवावी.
4) साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.29 नोव्हेंबर) झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पुढील हंगामापासून वजनासाठी डिजिटल वजन काटे सुरू करण्यात यावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला कसे सुखी करता येईल यासाठी त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले आहे.