TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 ऑगस्ट 2021 – ट्‌विटर ही सोशल मीडिया साईट पक्षपातीपणा करीत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. काही महत्वाच्या विरोधी पक्ष नेत्यांची खाती ट्‌विटरने तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहेत, त्यांची ही कृती म्हणजे देशाच्या राजकारणातील हस्तक्षेप आहे, असे देखील त्यांनी म्हटले होतं. त्यानंतर ट्विटरने आता माघार घेतली आहे आणि राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट अनलॉक केलं आहे.

दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. तसेच त्याचे फोटो ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांचे ट्विटर खातं ६ ऑगस्टला बंद करण्यात आलं होतं.

सुमारे आठ दिवसांनी ट्विटरने कारवाई मागे घेत राहुल यांचे खातं अनलॉक केलंय. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या २३ नेत्यांची ट्विटर खाती पुन्हा सुरु केली आहे. ट्विटर खातं पुन्हा सुरू होताच मुंबई यूथ काँग्रेसने ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलंय.

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर संताप व्यक्त केला होता. जी कंपनी सरकारच्या प्रभावाखाली आहे आणि ती जर आपल्याला राजकारण कसे करायचे याचे धडे घालून देत असेल तर अशी कंपनी चालू ठेवायची काय? याचा विचार करण्याची वेळ आलीय, असेही राहुल गांधी यांनी म्हटले होतं. मात्र, राहुल गांधी यांचं ट्विटर अकाउंट अनलॉक केल्यानंतर ट्विटरकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आली नाही.