TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 जुलै 2021 – मागील आठ महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन अजून देखील सुरू आहे. काँग्रेसनेही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.

सरकार चर्चेसाठी तयार असले, तरी शेतकरी कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी ट्रॅक्टरवरून संसदेत आले. मात्र, पोलिसांनी कारवाई करत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेतले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी सोमवारी सकाळी काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत आले. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुड्डा यांसह अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या हातामध्ये कृषी कायदे मागे घेण्याविषयी फलक होते. मात्र, संसद परिसरातून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला व बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेतले.

हा शेतकऱ्यांचा आवाज आहे, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. हे काळे कायदे आहेत. शेतकऱ्यांवर खोटे आरोप केले जाताहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना दहशतवादी म्हटलं जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

तर, दुसरीकडे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची जंतरमंतरवर निदर्शने सुरू केली आहेत. दररोज २०० शेतकरी इथे येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारत आहेत. ९ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.