टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट 2021 – चर्चेविना पारित झालेल्या विधेयकावर सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांनी चिंता व्यक्त केलीय. संसदेमध्ये चर्चेविना महत्त्वाची विधेयके, कायदे मंजूर होत आहेत, याबाबत नाराजी व्यक्त करत हे योग्य नाही, असंही रमन्ना यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलंय. संसदेतील गोंधळ व चर्चेशिवाय काही कायदे मंजूर झाल्याने त्यात त्रुटी आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. बाहेरून आलेल्या मार्शल्सने विरोधीपक्षांच्या खासदारांना मारहाण केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. याच गोंधळामध्ये विधेयकही पास केले गेले.
कोणत्याही कायद्यावर संसदेमध्ये चर्चा झाली नाही, तर कायद्याचा उद्देश, हेतू आणि तो लागू केल्याने होणारे फायदे किंवा तोटे लक्षात येणार नाहीत. त्यावर योग्य चर्चा झाली तर त्यातील त्रुटी दूर करणे शक्य आहे.
योग्य चर्चेशिवाय कायदे मंजूर झाल्याने त्यातील त्रुटींमुळे न्यायालयामध्ये येणाऱ्या प्रकरणांत वाढ झाली आहे, असेही रमन्ना यांनी म्हटलंय.
संसदेमध्ये पूर्वी विविध कायदे मंजूर करण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा केली जात होती. त्यामुळे त्या कायद्यांबाबत योग्य ती माहिती मिळत होती. केवळ आरोप किंवा प्रत्यारोप न करता कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण व ज्ञान वाढवणारी चर्चा होत असे. त्यामुळे कायदा लागू करणे व समजणे न्यायालयानांही सोपे जात होते. आता वकिलांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत रमन्ना यांनी व्यक्त केलं आहे.