टिओडी मराठी, मुंबई, दि. 4 जुलै 2021 – केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांना महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी विरोध दर्शविला आहे. हा विरोध कालही होता, आज ही आहे आणि उद्याही कायम राहील. विधानसभेत या कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पारित करण्याचे काम सरकारकडून होणार आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय.
या कायद्यांबाबत खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारला कोणताही सल्ला दिला नाही. मात्र, काही माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. तीनही कृषी कायदे रद्द व्हावेत, ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
तसेच या कृषी कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारतर्फे समिती नेमली होती. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करुन शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. अभ्यासाअंती आपला अहवाल सरकारला देणार आहे. या अहवालातील मसुदा शेतकऱ्यांना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
खासदार शरद पवार यांनी पत्रकारांना केंद्र सरकारमधील हालचालींची माहिती दिली होती. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले म्हणजे तिन्ही कृषी कायद्याबाबत शरद पवार यांनी सल्ला दिला असा होत नाही, असेही मलिक यांनी सांगितले.
आमच्या सरकारचा व राष्ट्रवादी पक्षाचा सुरुवातीपासून आजपर्यंत तीनही कृषी कायद्याला कायम विरोध राहिला आहे. हे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.
More Stories
‘अग्निपथ’साठी लवकरच राबवली जाणार भरती प्रक्रिया
सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत? दिल्लीत महत्वाची बैठक
वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर; ‘या’ विषयावर केले भाष्य