TOD Marathi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये या यात्रेचे आगमन होणार आहे. काँग्रेसच्या या यात्रेवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे (BJP Anil Bonde)यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींची तुलना रावणाशी करत खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे. “रामाने उत्तरेपासून दक्षिणेकडे यात्रा केली होती. मात्र, राहुल गांधी दक्षिणेपासून सुरूवात करत उत्तरेकडे निघाले आहेत. म्हणजेच ते रावणाचं काम करत आहे, रामाचं नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि रावणामध्ये बरंच साम्य आहे”, असे बोंडे यांनी म्हटले आहे. ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम राहुल गांधी या यात्रेत करत आहेत, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे.

‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा १६ दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेत्यांनी महाविकासआघाडीमधील आपले प्रमुख मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील या यात्रेत सहभाग नोंदवण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणावरुन भाजपाने ट्वीटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आदेश!.”, असं भाजपाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीट सोबत भाजपाने व्यंगचित्र जोडलं असून, त्यात उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकून मुजरा करताना दिसत आहेत.