TOD Marathi

टिओडी मराठी, सांगली, दि. 20 जून 2021 – सांगली आणि कोल्हापूर परिसरात दमदार पाऊस झाल्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल, असा विश्वास व्यक्त केलाय.

पूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा पार पडली आहे, असे पाटील यांनी सांगितले. सांगलीमध्ये सामाजिक संस्थेच्या वतीने निर्माण केलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते.

संभाव्य पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सांगलीवाडी इथं मराठा बोट क्लबच्या वतीने ‘जयंत रेस्क्यू फॉर्स’ची स्थापना केली आहे. या माध्यमातून पूर परिस्थितीत बचावकार्य करण्यात येणार आहे. या पथकाचा लोकार्पण सोहळा जयंत पाटील यांच्या हस्ते आज पार पडला.

यावेळी जयंत पाटील यांनी बोटीतून कृष्णा नदीच्या पात्रात फेरफटका मारत पाहणी केली. यावेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्यातमध्ये पूर येतो. त्याचा फटका सांगली, कोल्हापूर, सातारासह कर्नाटक राज्याला देखील बसतो. त्यामुळे याबाबत दोन्ही राज्याचा समन्वय असावा, यासाठी बैठक घेतली. कर्नाटक राज्याने चांगला प्रतिसाद दिलाय.

जयंत पाटील-येडियुरप्पांत चर्चा :
पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचे संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली.

अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमधील कृष्णा व पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचे संकट टळेल.

त्या अनुषंगानेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाचे अधिकारी व मंत्री स्तरावर कर्नाटकातील बंगळुरुत बैठक पार पडली. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करुन महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.