TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 20 जून 2021 – ओबीसी आरक्षणाच्या विषयात वेळ काढूपणा करणाऱ्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर २६ जून रोजी भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज रविवारी (दि. 20 जून) पुण्यात केली.

ओबीसींच्या आरक्षणाप्रश्‍नी राज्य सरकार जबाबदार आहे. या विषयात राज्य सरकार केंद्र सरकारला ओढून राज्य सरकार केवळ राजकारण करत आहे., असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. जनगणनेच्या नावाखाली केंद्राला जबाबदार धरून राज्य सरकार केवळ दिशाभूल करत आहे.

भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक आज पुण्यात झाली. त्यानंतर ओबीसी समाजाची देखील बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, मुळात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण गमवावे लागलं आहे.

राज्य सरकार न्यायालयामध्ये पुरेशी बाजू मांडण्यात कमी पडले. त्याचा परिणाम म्हणून आरक्षण रद्द झाले. राज्य सरकार ओबीसींच्या विषयात उदासीन असल्याने न्यायालयात त्यांना पूर्ण तयारीनीशी बाजू मांडावी, असे वाटले नाही.

आरक्षण रद्द होण्यास केवळ राज्य सरकार जबाबदार असून त्यांच्या अपयशाला ते इतरांना जबाबदार धरत आहे. या विषयात केवळ वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर येत्या 26 जून रोजी भाजपाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.