TOD Marathi

टिओडी मराठी, बीजिंग, दि. 20 जून 2021 – जगात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनने लसीकरणात आघाडी घेतली आहे. रविवारी चीनमध्ये कोरोना लशीचे सुमारे शंभर कोटींहून अधिक डोस नागरिकांना दिल्याची घोषणा केली. जगात सध्या अडीचशे कोटी डोस दिले असून त्यात चीनचा वाटा सर्वाधिक ठरलाय.

चीनच्या वूहान शहरातून कोरोनाच्या संसर्गाला सुरूवात झाली. त्यानंतर काही महिन्यांत या विषाणूने जगाला विळखा घातला. यापासून बचावासाठी जगात प्रतिबंधात्मक लशींवर संशोधन सुरू झाले.

गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत जगभरात अनेक लशी विकसित केल्या. त्यानंतर वेगाने लसीकरणाला सुरूवात झाली. सुरूवातीला चीनमध्ये लसीकरणाचा वेग अत्यंत संथ होता. पण, मागील काही दिवसांपासून यात चीनने मोठी आघाडी घेतलीय.

चीनची लोकसंख्या सुमारे 140 कोटी इतकी आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये 100 कोटींहून अधिक कोरोना डोस दिलेत. किती नागिरकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे?, याची माहिती अजून समोर आलेली नाही.

मात्र, या महिन्याच्या अखेरीस एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. तर वर्षअखेरीस हा आकडा 70 टक्क्यांपर्यंत नेणार आहे.

असे आहे चीनची लसीकरण मोहीम :
चीनमध्ये जून महिन्यामध्ये दररोज सरासरी सुमारे पावणे दोन कोटी डोस दररोज दिलेत. त्यामुळे कमी कालावधीत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चीन वगळता जगात दररोज 3 कोटी 70 लाख डोस दिले जाताहेत. चीनमध्ये सध्या ७ लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी ५ लशींचे दोन डोस द्यावे लागत आहेत. दोन डोसमध्ये ८ आठवड्यांचा कालावधी ठेवला आहे.

चीनमध्ये यंदा 200 ते 300 कोटी लशींचे उत्पादन होऊ शकते. चीनमधील कोरोना संसर्गाचे प्रमाणही खूप कमी आहे. रविवारी चीनमध्ये केवळ 23 नवीन रुग्ण आढळून आलेत. रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांत लसीकरणावर अधिक भर दिला आहे.