TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जुलै 2021 – अखेर ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त करत ही कारवाई केली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट देत होते, असा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता. याचा तपास ईडीकडून सुरू आहे.

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी वारंवार कार्यालयात बोलावलं. त्यासाठी समन्स जारी केलं. मात्र, तीन समन्सनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिले नाहीत. देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगा यांना ही ईडीने समन्स बजावलं होतं.

मात्र, हे दोघेही ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहिले नाहीत. १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच संदर्भात ईडीला त्यांच्या पत्नी व मुलाची चौकशी करायची होती.

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अनिल देशमुख यांना एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीने देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले. देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले. या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे.

‘आता केवळ ४ लाख २० कोटी रुपये जप्त झालेत. लवकरच १०० कोटी जप्त होतील आणि देशमुख यांच्यावर देखील जप्ती येईल’, असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी देशमुखांच्या अटकेचे संकेत दिलेत.

त्याला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी कडक प्रत्युत्तर दिलं. ईडी स्वायत्त संस्था आहे ना? मग, त्यांच्या कारवाईची माहिती सोमय्यांना अगोदर कशी मिळते? ते इतक्या विश्वासाने दावे कसे काय करतात? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केलेत. ईडीने सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का? असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.