TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जुलै 2021 – कोरोनामुळे राज्य शासनाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल आज 16 जुलैला जाहीर होणार असल्याची घोषण केली होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत सर्व माहिती दिली आहे. आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. एवढ्यातच अकरावीच्या प्रवेशाबाबत अर्थात सीईटी परीक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेबाबतची माहिती दिली आहे. आजच्या शालेय शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत या परीक्षेबद्दल माहिती दिली आहे.

शालेय शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार, ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी नाही. ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात अशांसाठी आहे. ही परीक्षा साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा त्यानंतर घेणार आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरच पोर्टल खुलं होणार आहे आणि रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंडळाकडून दिली आहे. त्यामुळे आता दहावीचा निकाल तर लागला मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर सीईटी परीक्षेचं नवं आव्हान असणार आहे.

जाणून घ्या, अशी होणार सीईटी परीक्षा :
ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार असून एकूण 100 मार्कांची ही परीक्षा होणार आहे. यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा ठेवला आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर केली जाणार आहे.