TOD Marathi

टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 16 जुलै 2021 – गेल्या चार वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. शहरातील काही महाविद्यालयातील दरवर्षी अधिक प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी शासनाकडे केली होती.

औरंगाबाद शहरातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, याबाबत सहसचिव राजेंद्र पवार यांनी शिक्षण संचालक, पुणे यांना प्रस्ताव पाठवला आहे. गेल्या चार वर्षापासून म्हणजेच 2017-18 पासून महापालिका हद्दीत अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेतले जात आहेत.

तेव्हापासून शहरातील महाविद्यालयामध्ये एकदाही शंभर टक्के प्रवेश झाले नाहीत. त्या तुलनेत ग्रामीण भागातील महाविद्यालयात क्षमतेपेक्षा अधिक प्रगत झालेले निदर्शनास आले आहे. जिल्ह्यामध्ये असलेली प्रवेश क्षमता आणि विद्यार्थी संख्या पाहता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियास संस्थाचालक विरोध करत आलेत.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थी गावी आहेत. तसेच ग्रामीण भागातून शहरामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या घटली आहे. पाच वर्षापासून शिक्षण विभागाकडून महानगरपालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जातेय. त्यात कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशासाठी अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळल्याचे दिसून आले आहे.

ऑनलाइन प्रवेशाची किचकट पद्धत आणि कोरोना संसर्गामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील महाविद्यालयात क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश होत आहेत.