पैशाचं घबाड!, आमिर खानच्या घरातून 17 कोटी रुपये जप्त

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं (ED) कोलकाता येथे एक मोठी कारवाई केलीय. कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खानच्या घरात ईडीला पैशाचं घबाड सापडलं आहे. आमिर खानच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती तब्बल 17 कोटी रुपयांची रोकड लागली आहे. पाच बॅग्समध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती.

ईडीने व्यावसायिक आमिर खानच्या गार्डन रीच येथील निवासस्थानी छापेमारी करत रोकड जप्त केली. शनिवारी सकाळी ही छापेमारी करण्यात आली. कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खानच्या निवासस्थानी ईडीला 10 बॅग्स सापडल्या. यामधील पाच बॅगांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा भरलेल्या होत्या. याशिवाय 200 रुपयांच्या नोटाही भरून ठेवण्यात आल्या होत्या.

ईडीने आर्थिक गैरव्यवहार कायदा 2002 नुसार ही कारवाई केली. फेडरल बँकेकडून (Federal Bank) मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती.

प्राप्त माहितीनुसार, आमिर खानने गेमिंग अ‍ॅपचा वापर करुन लोकांची फसवणूक केली. आमिर खानने ई-नगेट्स नावाच्या मोबाईल गेमिंग अ‍ॅपचा (Mobile Gaming Application) वापर करून युजर्सची फसवणूक केली. पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Please follow and like us: