दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 24 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेनं म्हणजेच दक्षिण छत्तीसगढच्या दिशेनं पुढे सरकणार आहे. दरम्यान, विदर्भात विजांच्या कडकडाटासह 11, 12 आणि 13 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यातच आला आहे. विदर्भात पुढील काही दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील मच्छिमारांना देखील पुढील काही दिवस अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसात पावसाचा जोर बघता, भारतीय हवामान विभागाकडून सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.