TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहत आहे. या तौत्के चक्रीवादळामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील, रायगड जिल्ह्यात 3 तर जळगावात दोघांचा समावेश आहे. अद्याप मुंबईतून जीवितहानी बाबत कोणतेही वृत्त नाही.

पुढच्या काही तासांत मुंबईमध्ये जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, असे हवामान विभागाने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत असेल असा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

रायगड जिह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भेंडखोल येथे समुद्र उधणलेला असून जोरदार वारे वाहत आहेत. याशिवाय रायगडला रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग पेक्षाही भयानक स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. यामुळे रायगडवासी चिंतेत असून मागील निसर्ग वादळाच्या आठवणी अजूनही ताज्या असताना या चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे.

चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला असून समुद्रालगत असलेल्या पश्चिम उपनगरांना पाऊस आणि वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढलंय. पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी 3 तासात शंभर मिली मीटर पावसाची नोंद झालीय.