TOD Marathi

टिओडी मराठी, कोलकत्ता, दि. 17 मे 2021 – नारडा घोटाळ्यात पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे ममता यांनी सीबीआय कार्यालयात जात मला देखील अटक करा, असे आव्हान दिल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. यानंतर तिथे जमलेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे वातावरण तापले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.

विधानसभा निवडणूक संपून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर राजकारण उफाळून आले आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरु झालीय. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममता यांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली. यानंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हि सीबीआय कार्यालयात गेल्या.

मंत्री, आमदारांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे कळल्यानंतर सीबीआय कार्यालयाबाहेर तृणणूलच्या कार्यकर्त्यांनी जमाव करत आंदोलन केलं. यानंतर काही वेळाने कार्यकर्त्यांनी सीबीआय ऑफिसवर दगडफेक झाली. यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी कोलकाता पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कोलकाता पोलीस कायद्याचे पालन करत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

चौकशी सुरु पण, अटक नाही : CBI
या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्यामध्ये चौकशीसाठी सीबीआय़ कार्यालयात आणले आहे. या चारही नेत्यांना प्रश्न विचारले जाणार असले तरी, त्यांना अटक केली नाही, असे सीबीआयने म्हंटले आहे.

राज्यपालांनी दिली कारवाईला मंजुरी :
काही दिवसांपूर्वी राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंगप्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिलीय. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यापासून हे नेते ममता यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. राज्यपालांनी निवडणूक संपल्यानंतर या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती.