२०१६ पासून बांधकाम सुरू असलेल्या मुंबईतील मेट्रो 3 चाचणी (Mumbai Metro 3 Trial Run) आजपासून सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या चाचणीचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आरे सारीपूतनगर इथे ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला. सारीपूतनगर ते मरोळ नाका येथील ट्रॅकवर ट्रायल रन घेण्यात आली. सारीपूतनगर ते मरोळ नाका स्थानकादरम्यान ३ किमी लांबीच्या बोगद्यात ही चाचणी घेण्यात आली. बीकेसी आणि धारावीला जोडण्यासाठी ३ भुयारे आहेत. ८ डब्ब्यांची ही पहिली मेट्रो असणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो कॉरिडोर तयार करत आहे.
एमएमआरसीएलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा वेग, आपत्कालीन ब्रेक यासह विविध निकषांच्या आधारे या मेट्रो ३ ची चाचणी केली जाईल. १००० किमी ट्रायल रन सहा महिन्यांच्या कालावधीत आयोजित केला जाईल. या चाचण्या तात्पुरत्या सुविधा क्षेत्रापासून सुरू होणाऱ्या बोगद्यांमध्ये घेतल्या जातील. ही चाचणी तीन ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालेल. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी MMRCL ला ९ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे.
मेट्रोसाठी किती खर्च?
३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग दक्षिण मुंबई आणि त्यांच्या उपनगरांना जोडेल आणि दोन टप्प्यांत मार्ग सुरू केला जाणार आहे. MMRCL सिप्झ आणि बीकेसी दरम्यानच्या कॉरिडॉरचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत आणि बीकेसी आणि कुलाबादरम्यानचा दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. मेट्रो ३ मार्गाचं काम २०२१ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्या वेळी हा खर्च २३,१३६ कोटी रुपये इतका होता. परंतु काही कारणांनी हे काम रखडलं गेलं होतं. त्यामुळे आता हा खर्च २३,१३६ कोटी रुपयांवरुन ३७,२७५ कोटी रुपये इतका झाला आहे.
मेट्रोचे स्टेशन्स:
३३. ५ किलोमीटर लांबीच्या या मुंबई मेट्रोला २७ स्टेशन्स असणार आहेत. २०१६ ला सुरू झालेला हा प्रकल्प २०२५ च्या अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. ९८.८ टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. तसंच सिव्हिल वर्क ८४ टक्के पूर्ण झालं आहे, एकूण जवळपास ७३ टक्के प्रोजेक्ट पूर्ण झालं आहे. बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एयरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एयरपोर्ट, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ, आरे डेपो अशी ही स्टेशन्स असणार आहेत. या मेट्रोचा वेग ८५ ते ९५ किमी प्रति तसं असेल. सुरुवातीला सारीपूतनगर ते मरोळ नाका मार्गावर चाचणी होत असून तांत्रिक सुधारणांसाठी ही चाचणी घेण्यात येत आहे.
मेट्रोची वैशिष्ट्ये:
मेट्रो ३ संपूर्ण एसीसोबत स्वयंचलित असणार आहे. तसंच मेट्रोमध्ये प्रत्येक डब्ब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन, धूर, अग्निशोधक यंत्रणा, आर्द्रता नियंत्रण यंत्रणाही आहे. जाहिराती आणि प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी लावण्यात आले आहेत. संपूर्ण मेट्रो मार्गाचा डिजिटल नकाशा इथे देण्यात आला आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअर ठेवण्यासाठी विशेष सोय आहे. मेट्रोमध्ये बसण्यसाठी चांगली बैठक व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि मेट्रो नियंत्रक यांच्या संवादासाठी ध्वनीयंत्रणा देखील देण्यात आली आहे.