TOD Marathi

मुंबई: केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (RPI President Ramdas Athawale) यांनी गुलाम नबी आझाद यांना केंद्रात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (NDA) येण्याचं आवाहन केलं. आझाद यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. (Ghulam Nabi Azad should join NDA, Says Ramdas Athawale) राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची लोकप्रियता वेगानं कमी होत आहे. अनेक नेते पक्ष सोडत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानं आता ते ‘आझाद’ झाले आहेत, असं आठवले म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे बहुतांश नेते आझाद यांच्यासोबत जातील. आझाद यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावं. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी एनडीएमध्ये यायला हवं. जर त्यांना स्वत:चा पक्ष काढायचा असल्यास ते तसं करू शकतात. त्यासाठी ते स्वतंत्र आहेत. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास त्यांच्या पक्षानं एनडीएमध्ये यायला हवं, असं आठवलेंनी म्हटलं. आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे जाईल असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास ते एनडीएसाठी चांगलं असेल, असं उत्तर आठवलेंनी दिलं. भाजप आणि एनडीए येत्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा बहुमतासह सरकार स्थापन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.