TOD Marathi

दिल्ली |  मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. त्यानंतर राहुल गांधी आज (९ ऑगस्ट) लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकावरील खासदारांनी मणिपूरप्रश्नी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात राहुल गांधींनी केलेल्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

लोकसभेत सोमवारी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. यावर आज (९ ऑगस्ट) राहुल गांधी यांनी भाषण केलं. भाषण करून राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृह सोडलं. राहुल गांधी बाहेर पडत असताना त्यांच्या हातातल्या काही फाईल्स खाली पडल्या. त्या फाईल्स उचलण्यासाठी राहुल गांधी खाली वाकले. तेव्हा तिथे बसलेले भाजपा खासदार राहुल गांधींवर हसले. भाजपा खासदारांच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी या सर्व खासदारांना पाहून फ्लाइंग किस केलं. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला नसला तरी काही साक्षीदारांकडून माहिती घेत इंडिया टूडेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचा ” …“…हे बच्चू कडूंचं दबावतंत्र असू शकतं”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं विधान”

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या कृतीवर भाजपा खासदारांनी आक्षेप घेतला. तसेच एनडीएमधील महिला खासदारांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. एनडीएच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी भाजपा खासदार स्मृती इराणी यांच्याकडे पाहून अयोग्य हावभाव केल्याचा आणि सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा आरोप एनडीएच्या महिला खासदारांनी केला आहे.