TOD Marathi

नाशिक | पंकजा मुंडे यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे. त्यांच्याकडे ताकदही आहे. त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे दहा-पंधरा आमदार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युती करू, असं वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलं आहे. दिव्यांग मेळाव्याचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले असून आज यासाठी आमदार बच्चू कडू हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला कालपासून सुरुवात झाली असून त्या देखील नाशिकमध्ये आल्या आहेत.

बच्चू कडू यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेसंदर्भात विचारले असता बच्चू कडू यांनी पंकजांसोबत युती करण्याची तयारी दर्शवली. पंकजा मुंडे यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे. त्यांच्याकडे ताकदही आहे. पुढची राजकीय समीकरणे पाहता आम्ही युतीसाठी इच्छुक असल्याचे संकेतच बच्चू कडू यांनी यावेळी दिले.

हेही वाचा” …“आरक्षण मिळणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान”

बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांच्याकडे क्षमता आहे यात मला शंका नाही. आमच्यात सुद्धा क्षमता आहे, आम्ही मेहनत करतो. आम्ही गावा गावात जातो, जिल्ह्यात जातो, माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. जेवढे लढायचं तेवढे लढतोय, जेवढं काम करायचं तेवढं करतोय, आमच्यात क्षमता नसताना, आमचा बापदादा राजकारणात नसताना सुद्धा कामातून सेवेतून उभं केलेलं वलय आहे. आम्ही कुणाला जाती बद्दल सांगितलं नाही, सेवा हा आमचा पहिला धर्म आहे आणि सेवेशिवाय आम्हाला काही समजत नाही. पंकजाताईंमध्येही क्षमता आहे. स्वतःचे दहा-पंधरा आमदार असले तर काही हरकत नाही, आम्हीही त्यांच्यासोबत युती करू, असे बच्चू कडू म्हणाले.

केवळ नेत्याच्या मागे लोक असून चालत नाही. लोकांची कामेही करावे लागतात. पंकजा मुंडे यांनी मनावर घेतले तर त्या काहीही करू शकतात. त्यांच्यामागे लोकांची शक्ती आहे, मुंडे नावाचं वलय आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.