.
नवी दिल्लीः
कॉंग्रेस, देशाच्या इतिहासातील सर्वात जुना राजकीय पक्ष. गल्ली ते दिल्ली… प्रत्येक सत्ता कॉंग्रेसने दीर्घकाळ अनुभवली आहे. मात्र कधीकाळी देशभरात सगळींकडे सत्ता असलेला पक्ष आता आव्हानात्मक काळातून जात आहे. अलीकडेच कपिल सिब्बल (Kapil Sibal), गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्य्सारखी ज्येष्ठ मंडळी पक्ष सोडून गेली. गेले काही दिवस सोनिया गांधी (Sonia Gandhi) कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. लोकसभेच्या निवडणुकांतील सलग दोन पराभव आणि गेल्या नऊ वर्षांत असंख्य निवडणुकांतील पराभवांचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी पूर्ण वेळ अध्यक्षाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे जाण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, ही निवडणूक खऱ्या अर्थाने निवडणूक असेल, की केवळ औपचारिकताच असेल हे येणारी वेळच सांगेल मात्र यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहील, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सध्या वैद्यकीय कारणांसाठी परदेशात असून, त्यांनी या बैठकीत ऑनलाइन सहभाग नोंदविला. सदर बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत; तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आनंद शर्मा या बैठकीला उपस्थित होते.
यानंतर काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर (Congress Presidential Election) करण्यात आला. ज्याचं परिपत्रक 22 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल तर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान असेल. अर्ज छाननी प्रक्रिया एक ऑक्टोबरपर्यंत होईल. आणि 8 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज मागे घेता येईल. 17 ऑक्टोबरला मतदान होऊन 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येईल. या झाल्या निवडणूक प्रक्रियेच्या तारखा मात्र खरा प्रश्न हा आहे की काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार?
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पद न स्वीकारण्यावर ठाम असल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्याच नावाचा आग्रह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी धरला आहे. राहुल गांधींच्या व्यतिरिक्त राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे देखील नाव या पदासाठी आघाडीवर आहे. मात्र, अशोक गहलोत यांनी स्वतः तीन दिवसात दोनदा राहुल गांधींनीच अध्यक्षपद स्वीकारावं अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे असंही काँग्रेसच्या अनेकांना वाटत आहे. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवलेलं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कार्यकारी समितीसह पक्षातील सर्व पदांसाठी निवडणूक झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संघटनात्मक निवडणुकाच पक्षात झाल्या नाहीत असे देखील मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, कॉंग्रेस अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागला आहे.
दरम्यान ‘एखादा होयबा अध्यक्ष आल्यास काँग्रेस पक्षाचा निभाव लागणे अशक्य आहे,’ असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. कार्यकारी समितीसह पक्षातील सर्व पदांसाठी निवडणूक झाली पाहिजे, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.