TOD Marathi

गौतम अदानींच्या नावे नवा विक्रम; जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर

मुंबई:

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. काही वर्षांपूर्वी जगात अनेकांसाठी ते परिचीत नसले तरी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. अदानी समुह आपल्या व्यवसाय विस्तारासाठी अनेक विविध क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्याला दिसत आहे.

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकत गौतम अदानी यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप-३ यादीत प्रवेश करणारे अदानी हे पहिले आशियाई उद्योगपती देखील ठरले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, (Bloomberg Billionaire Index) अदानींनी आता लुईस व्हिटॉनचे (Louis Vuitton) सीईओ आणि अध्यक्ष बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard arnault) यांना मागे टाकले आहे. निर्देशांकानुसार, अदानीची एकूण संपत्ती सध्या १३७.४ अब्ज डॉलर इतकी वाढली आहे. आता अदानींच्या पुढे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) हे आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती सध्या २५१ अब्ज डॉलर आहे, तर बेझोस यांची १५३ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.