TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 जुलै 2021 – जगासह देशामध्येही पेगॅसस प्रकरणावरून गोंधळ सुरु आहे. याच पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी सरकारला घेरण्यासाठी योजना तयार करत आहेत, असं समजत आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये पेगॅसस प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते.

इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या डेटाबेसमधून उघडकीस आलेल्या माहितीमध्ये ५० हजार मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे, असं समोर आलं आहे.

त्यातील 300 मोबाइल क्रमांक भारतीय असून ते मोबाइल क्रमांक वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांचे आहेत, असेही समजलं आहे. त्यामुळे सत्ताधारी सरकार याचा गैरवापर करत आहे. म्हणून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. म्हणून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जात आहे.

यासंदर्भात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीला सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील या बैठकीला हजर होते.

या दरम्यान, पेगॅसस प्रकरणावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्थगन प्रस्ताव नोटीस दिलीय. सध्या पेगॅसस हे स्पायवेअर प्रकरण देशात गाजत आहे.

केंद्रातील मोदी सरकार या पेगॅसस स्पायवेअरचा दुरुपयोग करत आहे, असे आढळत आहे. कारण, पेगॅसस स्पायवेअर हे सॉफ्टवेअर केवळ जबाबदार, अधिकृत शासकीय यंत्रणा यांना दिलं जात आहे.

हे पेगॅसस स्पायवेअर जासूसी करण्याचं काम करतं, त्यामुळे याचा वापर योग्य ठिकाणी होणं अपेक्षित आहे. मात्र, जर याद्वारे फोन टँपिंग करून खासगी बाबींचं उल्लंघन होत असेल तर ते योग्य नाही. म्हणून विरोधकांनी पेगॅसस स्पायवेअर वरून सरकारला घेरलं आहे.