TOD Marathi

Karnataka ला मिळाले नवे CM ; बसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, Yeddyurappa यांनी दिला होता CM पदाचा राजीनामा

टिओडी मराठी, बंगळुरु, दि. 28 जुलै 2021 – कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला. बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वेच्छेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केलं होतं. आता बोम्मई कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री असणार आहेत.

भाजपच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर दबाव असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. पण, येडियुरप्पांनी सोमवारी आपल्यावर कोणताही दबाव नाही. स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे स्पष्ट केलं होतं.

आज ११ वाजता बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा शपथविधीप्रसंगी उपस्थित होते. या बरोबर भाजपचे इतर अनेक मोठे केंद्रीय आणि राज्य ज्येष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते.

बसवराज बोम्मई हे येडियुरप्पांप्रमाणे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते येडियुरप्पांचे निकटवर्तीय आहेत. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक पदांची जबाबदारी पार पाडली आहे.

मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली होती. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या ४० आमदारांनी त्यांची भेट घेतली होती, असे सांगितले जात आहे.