टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 20 ऑगस्ट 2021 – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये शेतकरी कायदे, केंद्र आणि राज्यातील समन्वय यावर चर्चा होणार आहे. मात्र, आम आदमी पार्टी आणि अकाली दल यांना या बैठकीचे निमंत्रण नाही, असे सांगण्यात येत आहे.
देशातील मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांची ही बैठक होणार आहे. जे पक्ष राज्य स्तरावर विरोधी पक्षात काम करत आहेत, त्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक होणार आहे. देशापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. त्यापैकी पॅगसेस, महागाई यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, झारखंड, केरळ ,छत्तीसगढचे मुख्यमंत्री यात सहभागी होणार आहेत. देशात नरेंद्र मोदी सरकारकडून 2024 लोकसभा निवडणुकीची व्युहरचना आणि पर्यायी नेतृत्व यासह अनेक विषयांवर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे, असे समजत आहे.
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह देशातील विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अनेक नेते आदी सहभागी होणार आहेत.