TOD Marathi

पुणे: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय? आहेच ते संभाजीनगर,” असं म्हटलं होतं. यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का? उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. भाजप आणि शिवसेनेची केंद्रात सत्ता होती तेव्हा औरंगाबादच्या नामांतरचा प्रश्न का सोडवला नाही? उद्या औरंगाबादचे नामांतर झाले तर कशावर बोलायचे, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडतो. त्यामुळे हा मुद्दा सतत पेटवत ठेवला जातो, असंही राज ठाकरे म्हणाले. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करतो, असंदेखील राज यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे तीन मागण्या केल्या.

देशात समान नागरी कायदा आणावा,

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि

औरंगाबादचं लवकरात लवकर नामांतर करावं.

या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण कराव्यात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.