TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जुलै 2021 – राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय रणनीती करण्याच्या कामातून संन्यास घेण्याची प्रशांत किशोर यांनी अगोदर घोषणा केली होती. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात येण्याच्या चर्चेला आणखी बळ मिळत आहे.

प्रशांत किशोर यांनी काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. केसी वेणुगोपालही या बैठकीला उपस्थित होते.

तासभर ही बैठक चालली. या बैठकीत देशाचा राजकीय कल, देशातील काँग्रेसची सध्याची स्थिती आणि त्यावरील उपाय यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली.

प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यात पंजाबमधील वादावर चर्चा झाली नाही, असं सांगण्यात येतंय. विविध राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्या स्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. मात्र, यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे शरद पवारांकडे देण्यावर या बैठकीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचा लोकसभेतील नेता बदलणार नाही. या अधिवेशनात काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून अधीर रंजन चौधरीच काम पाहणार आहेत, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाही, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं. सध्या सुरू असलेलं काम पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही. या क्षेत्रात मी पुरेसं काम केलंय.

आता थांबण्याची व आयुष्यात वेगळं काही करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी हे काम सोडण्याचं ठरवलंय, असं प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.

2017 मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकीवेळी प्रशांत किशोर व राहुल गांधी यांची पहिल्यांदा भेट झाली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांची रणनीती काही चालली नव्हती.

काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. आता पाच वर्षानंतर प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना भेटले. पण, या भेटीऐवजी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, या चर्चांनीच अधिक जोर धरला आहे.