TOD Marathi

नवी दिल्ली :   

बीसीसीआयनं (BCCI) पुढच्या महिन्यात  18 ऑक्टोबरला एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. याचवेळी महिला आयपीएलबाबतही मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता बीसीसीआयची (BCCI Election) लवकरच निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्यासह सध्याच्या पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की नाही हे, हे या निवडणुकाच ठरवतील. येत्या 18 ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल आणि निवडणुका होतील. बीसीसीआने सर्व राज्य संघटनांना पत्र पाठवलं आहे. यामध्ये 18 ऑक्टोबरला होणारी एजीएम आणि त्यात कोणते मुद्दे मांडले जातील याची माहिती देण्यात आली आहे.

बीसीसीआयची ही 91 वी एजीएम  (91st AGM of BCCI in October) असणार आहे. मागील वार्षिक बैठक डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. महिला IPL वरील अपडेट्सपासून ते ICC मध्ये BCCI प्रतिनिधी निवडण्यापर्यंतचा अजेंडा बैठकीत आहे. मात्र सर्वात जास्त लक्ष वेधणारा विषय असणार आहे तो म्हणजे बोर्ड अधिकाऱ्यांची निवड.

विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आहे. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court Of India) नुकतंच बीसीसीआयच्या घटनेत बदल करण्यास परवानगी दिल्यानंतर आणखी एका कार्यकाळासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीत अनेकांच्या नजरा अध्यक्षपदावर आहेत. सौरव गांगुली पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार की जय शाह दावा सांगणार हा प्रश्न आहे? त्यामुळे ही वार्षिक बैठक अतिशय महत्वाची असणार आहे.