मी फर्ग्युसन कॅालेजला ॲडमिशन घेण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे पुरूषोत्तम करायला मिळावं..!

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक (Purushottam Karandak) स्पर्धेचा निकाल जाहीर झाला खरा, मात्र स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने कोणत्याही संघाला करंडक न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला. यावर अनेक लोकांनी, स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आणि यांसह वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni on Purushottam Karandak) यांनी देखील या संदर्भात त्यांची सविस्तर प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या द्वारे मांडली आहे. त्यामध्ये त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पुरुषोत्तम करंडकाबद्दल त्यांचं काय मत आहे हे देखील व्यक्त केलं आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला (Fergusson College Pune) ऍडमिशन घेण्याचा मुख्य कारण होतं ते म्हणजे पुरुषोत्तम करायला मिळावं असं देखील त्यांनी म्हटलंय…

सोनाली कुलकर्णी यांची पोस्ट:

पुरुषोत्तम करंडक २०२२
सुदर्शनमधे चर्चा सुरू होण्यापूर्वी..
१. परिक्षकांनी ह्या क्रांतीकारी निर्णायाबद्दल सविस्तर बोलावे.
२. महाराष्ट्रीय कलोपासकने आयोजक म्हणून ह्या निर्णयाचे विश्लेषण करावे.
३. सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालये ह्यांची प्रतिक्रिया पुढे यावी.
४. कोणत्याही कॅालेजने नाट्यविभागाच्या बजेटवर टाच आणू नये. ना ही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर..
५. समीरण, क्षितीज, सुव्रत, सचिन मोटे..
कडक पोस्टस् 🙏💕
६. निपुण…आभार, कौतुक आणि कृतज्ञता ♥️
उशीर झाला आहे.. सलग शूटिंग चालू होतं.. पण तरी लिहिल्याशिवाय राहवत नाही..
मी फर्गसन कॅालेजला ॲडमिशन घेण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे – पुरूषोत्तम करायला मिळावं..! अकरावीत सिनिअर्सनी दणकून दादागिरी केली.. ॲाडिशनला पिळवटून टाकणारा अभिनय करूनही माझी निवड झाली नाही. त्या वयातला निर्भिड उत्साह घेऊन मी दाद मागायला गेले – तर सिनीअर मंडळी म्हणाली, “ए बालवाडी, आत्ता आलीस ना कॅालेजात.. आधी स्ट्रगल कर..! शिवाय आम्हाला सुंदर दिसणारी चांगली अभिनेत्री हवी आहे.. तू दोन्ही नाहीस. निघायचं..”
चपराकच बसली.. पण झालेला अपमान सांगायचा कसा आणि कोणाला ..! मग वाटलं नाटकात काम करायला घेत नाहीयेत.. नाटकाचं काम तरी करू देतील.. ते का शिकू नये.. ॲम्फी थिएटरच्या स्टेजची, मेकअपरूमची स्वच्छता, कपडेपट, प्रॅापर्टी, चहापाणी, हिशोब हे सगळं बघायला सांभाळायला शिकले. बारावीतही नाटकात घेतलं नाही. मग मी लाईटस् करायला शिकले. माझे गुरू होते The राजाभाऊ नातू आणि मधु जोशी !!! राजाभाऊंनी चक्क स्पॅाट म्हणजे काय, बार कुठे असतो हे शोधून येण्याचा गृहपाठ दिला. भरत नाट्यमंदीर, टिळक, बालगंधर्व बघून येण्याचाही ! लाईटिंगची मुळाक्षरं शिकवली त्यांनी मला.. मी चार वर्षं लाईटस् केले – अगदी घोड्यावर चढून स्पॅाटही मीच ॲडजस्ट केले. ६० मिनिटात सेट, लाईटची तयारी करताना विठ्ठल – अरूणचं कौतुकाने बघणंही मनाला उभारी देणारं होतं..! विंगेत कलोपासकचं घड्याळ टिकटिकत असायचं.. त्याच्याबरोबर आमच्या काळजातली धडधड पण..
नाटकात काम करायला मिळालं तेंव्हा चांगलं काम म्हणजे काय हे माहिती नव्हतं.. पण काहीतरी शोधायचं होतं..आपल्या आतलं खरं काहीतरी त्या स्टेजवर ओतायचं होतं.. हपापल्यासारखं मित्राचं नाटक बघायचं होतं.. मनातल्या मनात स्पर्धा करून त्यांच्यापेक्षा चांगलं नाटक करायचं होतं.. आपल्या संघातल्या चुकांवर प्रचंड चिडायचं होतं.. शेवटी आसुसल्यासारखं निर्णयाची वाट बघून आनंदी किंवा निराश व्हायचं होतं.. सगळं मान्य होतं.. अन्याय, कौतुक, टीका.. सगळंच..
पुढे बक्षिसं मिळाली, करंडक घेतले.. पण लक्षात राहिली शेवटच्या वर्षी मी लिहिलेल्या मंजू ह्या एकांकिकेसाठी परिक्षक असलेल्या किंग लिअर शरद भुताडियांनी निकालानंतर माझ्यासाठी घाईघाईत लिहिलेली एक चिठ्ठी ! त्या चिठ्ठीत प्रोत्साहनाचे दोन शब्द होते.. भविष्यासाठी शुभेच्छा होत्या, अपेक्षा होत्या. निकालापलिकडे ती जी चिठ्ठी होती, तिची किंमत पुरुषोत्तमच्या पत्र्याइतकीच मौल्यवान होती माझ्यासाठी..
आमच्या कामाचा दर्जा काय होता हे बघण्याची परिपक्वता नव्हती अंगात – पण आपल्यापेक्षा मोठ्या माणसावर विश्वास ठेवण्याचं धाडस होतं, ते कर्तव्यच वाटायचं.. परिक्षक हे आपल्यासाठी न्यायाधीश असतात..आणि त्यांनी दिलेला कोणताही निकाल मान्य करण्याची धमक त्यावेळी आपल्या अंगात असतेच.
पण यंदा परिक्षकांनी कोडंच घातलं आहे ! हा निकाल म्हणजे मला अबोल शिक्षा वाटतीए.. त्यावर बोलूया ! नाहीतर उमलणारी मनं कोमेजून जातील किंवा चिडीला येतील. जे घडलंय, त्यामुळे होणारं मंथन ही कदाचित काळाची गरजच होती – पण फक्त आकाशवाणी न होता निकालाचा उहापोह केला तर परिक्षकांचा दृष्टिकोन आम्हाला समजेल..
महाराष्ट्रीय कलोपासकचं माझ्या आयुष्यात फार मोठं योगदान आहे. पुरुषोत्तम च्या पलिकडे त्यांनी अनेक गोष्टी केल्या. पं. सत्यदेव दुबेजींची नाट्य कार्यशाळा त्यांनी पुण्यात आयोजित केली. जी जवळजवळ ४-५ वर्षं चालली. त्या शिबिरामुळे आम्ही कितीतरी जण घडलो ! त्यापुढे कलकत्याच्या तापस सेन यांची एक प्रकाशयोजनेची कार्यशाळा कलोपासकनी घेतली. त्यानी आम्हाला केवढं शिकायला मिळालं.. त्यामुळे कलोपासक फक्त करंडकाइतकी मर्यादित नाही हे नक्की आणि राजाभाऊ, मधू जोशी सरांच्या आत्ताच्या कार्यरत पिढीने ते लावून धरले पाहिजे. तरच नवे कलाकार, नवे लेखक, नवी नाटकं घडतील.. नवी पिढी रुजेल, फोफावेल. नाराज होणं, कुढत राहणं, फक्त सिनेमात किंवा स्क्रीनवर स्वतःला शोधत रहाण्यात तरूण मुलं हरवली तर मग नाटक कोण करणार.. कधी करणार.. 🎭

Please follow and like us: