TOD Marathi

निळू फुले या मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटांतील एक अष्टपैलू कलाकार आहेत.अडीचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांना आपल्या अभिनयाने जिवंत करणाऱ्या निळू फुले यांची कहाणी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.आपल्या सहज अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर चरित्रपटावर काम सुरू करण्यात आलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद ओक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून टीप्स या सिनेमाची निर्मिती करणार आहे.( Nilu Phule Biopic)

नीळू फुले यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्य कथेने केली आणि या नाटकाचे २ हजारांहून अधिक प्रयोग केले. हे नाटक एवढं गाजलं होतं की निळू भाऊंना सिनेमात काम करण्याची मागणी होऊ लागली. १९६८ मध्ये आपलं अभिनय कौशल्य ‘एक गाव बारा भानगडी’ सिनेमातून दाखवलं आणि बघता बघता नीळू फुले मराठी सिनेमाचे सुपरस्टार झाले. नीळू भाऊ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कुली’ चित्रपटात अमिताभ बच्चन, ‘मशाल’मध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत आणि ‘सारांश’ चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत काम केले. आता लवकरच त्यांच्या आयुष्यावर चरित्रपट येत असून प्रसाद ओक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

२५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले दिवंगत अभिनेते निळू फुले( Nilu Phule Biopic)यांच्यावर लवकरच चरित्रपट येणार आहे. नीळू फुले यांनी १९६८ मध्ये नाटकांतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एक गाव बारा भानगडी हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता आणि त्यानंतर सामना, सिंहासन, पिंजरा, सोंगाड्या, थापड्या, चोरीचा ममल्ला, लक्ष्मी पुडवे पॉल, जैत रे जैत, सेनानी साने गुरुजी या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

नीळू फुले त्यांचा आवाज आणि संवादफेकीसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या चित्रपटातील संवाद हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय संवादांपैकी एक आहेत. असं म्हटलं जातं की चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांचे त्यांचं चित्रण इतकं वास्तविक होतं की खऱ्या आयुष्यातही स्त्रीया त्यांना घाबरून चार हात लांबच रहायच्या. सिनेमात दिसणारा दृष्ट व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तसाच वागत असेल असं तेव्हाच्या प्रेक्षकांना वाटायचं. या विचाराने अनेकजण त्यांचा तिरस्कार करायचे, पण नेमकी हीच गोष्ट त्यांच्या कामाची पोचपावती होती. हे फार कमी लोकांना माहीत आहे की निळू भाऊ यांनी समाजाच्या कल्याणासाठी खूप काम केले. निळू फुले यांचे २००९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.

निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak ) करत आहेत. या सिनेमाबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘मी नीळू फुले यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अनुभव होता. आता त्यांच्यावर चित्रपट बनवता येणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ते माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. मला आशा आहे की आम्ही त्यांची कथा योग्य पद्धतीने पडद्यावर मांडू शकू.'( Prasad oak nilu Phule)

त्याचबरोबर एका मुलाखती दरम्यान निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले( Gargi Phule) म्हणाल्या की, ‘प्रसाद ओक यांनी माझ्या वडिलांसोबत बराच वेळ घालवला आहे आणि त्यांच्यावर चित्रपट बनवण्यास तो खूप उत्सुक होता. मला त्याच्या कथाकथन आणि सर्जनशीलतेच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर विश्वास आहे. आम्हाला टीप्स म्युझिक कंपनीचाही मोठा पाठिंबा मिळाला.’ गार्गी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही बाबांसोबतच्या अनेक आठवणी सतत शेअर करत असतात.निळू फुले यांच्या चरित्रपटाची निर्मिती टीप्स करणार आहे. टीप्सचे एमडी कुमार तौरानी म्हणाले की, ‘निळू फुले यांचे मराठी चित्रपटसृष्टीत खूप मोठे योगदान आहे आणि हा चित्रपट त्यांना श्रद्धांजली आहे. आम्ही त्यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत आणि लवकरच आम्ही चित्रपटाचे शूटिंग करणार आहोत. आता आम्ही अशा अभिनेत्याच्या शोधात आहोत जो निळू फुलेचे पात्र पडद्यावर जिवंत करू शकेल.’
या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही समोर आली नाही आहे पण निळू फुले आणि प्रसाद ओके चाहते या चित्रपटाची आवर्जून वाट बघत आहे .