TOD Marathi

अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer: Mukkam Post Thane) चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak)  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. या भूमिकेमुळे प्रसाद ओकचे सर्वत्र कौतुक केले गेले. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. प्रसाद ओकचा एक अभिनेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) या भूमिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास आता सर्वांना जाणून घेता येणार आहे. त्याने या भूमिकेसाठी कशी तयारी केली, त्याची मेहनत, त्याला आलेले अनुभव या त्याच्या प्रवासावर त्याने एक पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ (Maza Anand) असं या पुस्तकाचं नाव असून नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आलं.

पुस्तकाच्या अनावरणाचे फोटो प्रसादने सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याला छानस कॅप्शन दिलं आहे. प्रसाद म्हणाला “श्री सिद्धिविनायक आणि मा. गुरुवर्य दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब,(Eknath Shinde) आणि मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब, (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते “माझा आनंद” या माझ्या पुस्तकाचं आज अनावरण झालं. मा. दादा भुसे जी, आमचे निर्माते मित्र मंगेश देसाई, आमचे मित्र श्री सचिन जी जोशी, आणि माझी पत्नी मंजिरी ओक हे सर्व माझ्या सोबत या आनंदाच्या क्षणी उपस्थित होते. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो”.

या पुस्तकाला कोणत्याही राजकारणाचा गंध नाही. केवळ एका कलाकाराने भूमिका साकारतानाच्या प्रवासावर लिहिलेले हे पुस्तक आहे, असे प्रसाद ओक म्हणाला. या पुस्तकाचं प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे केले जाणार आहे. या पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे. प्रज्ञा पोवळेनं या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे. तर सचिन गुरवनं याचे अक्षर सुलेखन केलं आहे. सध्या प्रसाद ने लिहिलेल्या ‘माझा आनंद’ या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे.