टिओडी मराठी, पुणे, दि. 11 जुलै 2021 – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यपद्धतीवर निशणा साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनाही टोला हाणला. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे खडसे म्हणाले होते. आता खडसे सीडी कधी बाहेर काढतात?, मी त्याचीच वाट पाहत आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असा आरोप केला. तसेच, काँग्रेसच्या कार्यकाळातही तेच झाले होते. आता भाजपही तेच करत आहे. तसेच, ईडीसारखी मोठी सरकारी यंत्रणा सरकारच्या हातातले बाहुले झालं आहे. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहत आहेत.
देशात भाजप सोडून इतर पक्षातील लोकांच्या व्यवहारावर लक्ष ठेऊन त्यांची ईडी मार्फत चौकशी केली जात आहे. त्यामुळे अनेक नेते ईडीला घाबरून आहेत. एकनाथ खडसे देखील पूर्वी भाजपमध्ये होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या व्यवहारावर लक्ष ठेऊन त्यांची ईडी मार्फत चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे काहीजण ईडीला घाबरून आहेत. तर, काहीजण याचा सहानुभूतीसाठी वापर करत आहेत, असे समजते.