TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 11 जुलै 2021 – कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटीनाने कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकाने विजेतेपदावर नाव कोरलं आहे. सुमारे 28 वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला आहे. याअगोदर 1993 मध्ये अर्जेंटिनाने हा किताब पटकाविला होता. अर्जेंटिना- ब्राझील यांच्यातील सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनाने 15 वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केलीय.

कोपा अमेरिका स्पर्धेमध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजेतेपद पटकावण्यासाठी झुंज दिली जाणार आहे, असे दिसत होतं.

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण फुटबॉलप्रेमींच लक्ष या सामन्याकडं लागलं होतं.

सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघाची झुंज बघायला मिळाली. पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावून आला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यामध्ये घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.

प्रतिस्पर्धी संघात झालेल्या लढतीमध्ये अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव करत किताबावर नाव कोरलं. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जातोय. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात संघाने पहिल्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलंय.

मेस्सीने जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नाही. कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयामुळे त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं.

तर, दुसरीकडे २०१९ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला पराभव स्वीकारावा लागला. फुटबॉल प्रेमींसाठी यंदाचा कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामना खास ठरला.

अंतिम सामन्यामध्ये फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकमेकांविरोधात खेळताना फुटबॉल चाहत्यांना बघायला मिळाले. या सामन्यात मेस्सी व नेमार हे २ फॉरवर्ड एकमेकांविरोधामध्ये मैदानावर उतरले होते.

28 वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस :
याअगोदर १९९३ साली अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता.

२०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. सुमारे २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली.