TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 मे 2021 – भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. लसीकरण गरजेचं आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार लसीकरणावर अधिक भर देत नसल्याचं आढळत आहे. परिणामी करोनामुळे देशातील मृतांच्या आकडेवारीत अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. कारण आज देशात मृतांच्या संख्येने सुमारे 3 लाखांचा टप्पा पार केलाय. यातही दुर्दैवाची बाब म्हणजे, करोनामुळे आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेल्या देशांच्या यादीतही भारताचा समावेश झालाय.

आरोग्य मंत्रालयाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 2 लाख 22 हजार 315 नव्या करोनाग्रस्त नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 02 हजार 544 जण करोनातून मुक्त झालेत. याअगोदर शनिवारी देशात 2 लाख 40 हजार नव्या करोनाग्रस्तांची नोंद झाली होती तर 3 हजार 741 करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला होता.

जगात करोनामुळे आतापर्यंत सुमारे 35 लाख जणांचा मृत्यू झाला असून यात तीन लाख भारतीयांचा समावेश आहे. या हिशेबाने जगात करोनाने मृत्युमुखी पडणारा प्रत्येक तेरावा व्यक्ती भारतीय होता. ब्राझील आणि अमेरिकेनंतर करोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झालेत. अमेरिकेत आतापर्यंत सुमारे सहा लाख आणि ब्राझीलमध्ये साडेचार लाख जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात जगातील सुमारे 17 टक्के लोकसंख्या आहे.

देशात करोनामुळे होणारा मृत्यूदर 1.13 टक्के इतका आहे तर रिकव्हरी रेट 88 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून 11 टक्क्यांपेक्षा कमी झालीय. करोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर असून एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे.