TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 12 ऑगस्ट 2021 – पुण्यात करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी स्थगित केलेल्या लोकल, डेमू सेवा अजूनही खुल्या झाल्या नाहीत. मुंबईमध्ये कोरोना लसचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, पुण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील लोकल, डेमू, पॅसेंजर सेवा नागरिकांसाठी खुली करावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे. तसेच पुण्याबाबत दुजाभाव का?, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

करोनामुले गेल्या वर्षी मार्चपासून नियमित रेल्वेसेवा स्थगित करून विशेष रेल्वे सोडण्यात येतेय. यात केवळ ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱ्या नागरिकांना प्रवेश आहे. याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवाहि बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.

मात्र, दुसरीकडे मुंबईत लसचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देणार आहेत. अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर विविध व्यवहार खुले झालेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे.

मात्र, रेल्वेकडून अद्यापही सर्वसामान्यांना उपनगरीय सेवांमध्ये प्रवेश दिला जात नाही. यावर पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, पुणे-बारामती आदी मार्गांवरील प्रवासास मुभा द्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून लोकल, डेमू, पॅसेंजर, एक्‍स्प्रेस आदी सेवा बंद आहे. पुण्यातील नागरिकांनी कोरोना लसचे दोन डोस घेतलेत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातून जोडणाऱ्या उपनगरीय सेवा सुरू कराव्यात.

रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून द्यावी. क्‍यूआर कोडऐवजी रेल्वेने प्रवाशांना पास द्यावा, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी म्हंटलं आहे.

तर, पुण्यातील लोकल, डेमूमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा आहे. शासनाकडून निर्णय घेतल्यानंतर रेल्वे प्रशासन त्यानुसार सेवा सुरू करेल, असे रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी म्हंटलं आहे.