TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 जून 2021 – इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्‍स इंजिनला सरकार परवानगी देणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले आहे. ब्राझील, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांनी याआधी फ्लेक्‍स इंजीनला परवानगी दिलीय.

त्यासह बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ, टोयोटा इत्यादीसारख्या कंपन्या इथेनॉलवर आधारित वाहने निर्माण करीत आहेत. स्थानिक पातळीवर तयार केलेले इथेनॉल इंजिनामध्ये वापरल्यानंतर क्रूड तेलाची आयात कमी होण्यास मदत होणार आहे, असे गडकरी म्हणाले आहेत.

या संदर्भातील आवश्‍यक परवानग्या येत्या ३ महिन्यात देणार आहे, असे त्यांनी सांगितले. इथेनॉलच्या पेट्रोलपंपांना परवानगी दिली जात आहे. अशा प्रकारच्या दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

उसाचा रस आणि मळीपासून इथेनॉल तयार करण्यास याआधी परवानगी दिली आहे. त्याचबरोबर आता तांदूळ, मका व इतर अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करण्याला परवानगी देण्याचा विचार सुरु आहे.

तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे गडकरी यांनी सांगितले. देशात अतिरिक्त तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन होते. याचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. बजाज ऑटो व टीव्हीएस या कंपन्यांनी इथेनॉलवरवर चालणाऱ्या दुचाकी तयार केल्यात.