TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 जून 2021 – भारतात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली असून लॉकडाऊनचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे १.१ लाख कोटींच्याआर्थिक मदतीची घोषणा केलीय, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या, आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची मदत करणार आहे. ही रक्कम नॉन मेट्रो मेडिकल इन्फ्रासाठी खर्च करणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेक्टर्सवर याचा परिणाम झाला.

त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात होती. गेल्या काही दिवसांत सरकार कोरोनाने ग्रस्त झालेल्या सेक्टर्सला मदत करण्याचा विचार करत आहे, असे वृत्त आले होते.

अर्थमंत्र्यांनी छोट्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी इमरजेंन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीममधील निधी वाढविला आहे. सध्या ही योजना ३ लाख कोटींची आहे ती आता ४.५० लाख कोटींपर्यंत वाढविली आहे. या योजनेतंर्गत MSME, हॉस्पिटॅलिटी सेक्टर्सला २.६९ लाख कोटी वितरीत केले जाणार आहेत.

तसेच मायक्रो फायनॅन्स इंस्टिट्यूशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी क्रेडिट गँरंटी स्कीमची घोषणा केलीय. ही नवी योजना आहे. या अंतर्गत व्यावसायिक बँकांच्या MFI ला देण्यात येणाऱ्या कर्जासाठी गॅरंटी दिली जाणार आहे. या योजनेचा फायदा २५ लाख लोकांना होईल, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ८ आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. त्यात ४ नवीन आहेत तर एक विशेष आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी देण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाऊनमुळे ज्यांना फटका बसला अशांना मदत करण्यासाठी सरकारने या पॅकेजची घोषणा केलीय.

मागील वर्षी कोरोनाने प्रभावित झालेल्यांना क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारने ‘आत्मनिर्भर’ पॅकेजची घोषणा केली होती. सरकारने यात एकूण २.७१ लाख कोटींची घोषणा केली होती.