टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 जून 2021 – केंद्राने संकटातही देशवासीयांकडून पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात सुमारे 4 लाख कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती देत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल च्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याची आठवण करून देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेरले आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कासंदर्भात मोदी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात 12 पट वाढ करुन जनतेची लूट केली आहे.
2013 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 101 डॉलर्स होते, तेव्हा त्यावेळी देशातील लोकांना पेट्रोल 66 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 51 रुपये प्रति लिटर दराने भेटत होते. त्यावेळचे केंद्र सरकार पेट्रोल प्रति लीटर केवळ 9 रुपये तर डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कर आकारत होती.
पण, आता सन 2021 मध्ये केंद्रातील हे नरेंद्र मोदी सरकार आपल्याकडून पेट्रोल प्रतिलिटर 33 रुपये आणि डिझेलवर 32 रुपये कर वसूल करत आहे. भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात 12 पट वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना देशवासीयांना त्याचा फायदा का दिला जात नाही?. असा सवाल देखील प्रियंका गांधी यांनी केला.
2014 पासून कर वसुलीत 300 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ योग्य आहे का?. केंद्र सरकारने 7 वर्षात पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून 21.5 लाख कोटी रुपये जमा केलेत. पण, त्या बदल्यात मध्यमवर्गीय, गरीब आणि व्यापारी वर्गाला काय मिळाले?. संकटाच्या वेळीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या रुपात केंद्र सरकारने देशवासीयांकडून सुमारे 4 लाख कोटी रुपये वसूल केलेत, असे प्रियंका यांनी म्हटलं आहे.