TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 29 जून 2021 – महाराष्ट्रातील काही शहरात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आढल्यामुळे काळजी म्हणून राज्यात सोमवारपासून निर्बंध लागू केले आहेत. पुण्यात देखील या निर्बंधांमुळे पुन्हा नाकाबंदी अन्‌ कारवाई सुरु केली आहे. करोनामुळे शहरात सोमवारपासून पुन्हा संचारबंदी लागू झाल्यामुळे आता दररोज सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना विनाकारण भटकंती करता येणार नाही.

अत्यावश्‍यक सेवा वगळता घराबाहेर फिरणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केलीय.

नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत.

त्यामुळे ‘नागरिकांनो, घरातच बसा. भटकंती करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई करू,’ असा इशारा पोलिसांनी दिलाय. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.