TOD Marathi

पुणे:

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण करत नितीन गडकरींसह शरद पवारांचंही कौतुक केलं. त्याचबरोबर साखर उद्योगातल्या तज्ज्ञांना एकत्र येऊन काम करण्याचं आवाहनही केलं आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्ही शहरी बाबू आहोत, साखरेबद्दल काय बोलणार? आम्हाला फक्त चहा मध्ये साखर किती एवढंच माहिती होतं. आता गाडीत साखर किती लागते हे म्हणायला हरकत नाही. प्रत्येकवेळी साखर कारखाने, ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांना आधार देत असतो. काही कारखाने उत्तम चालू आहेत पण सहकारी कारखाने कमी चालतात.”

नितीन गडकरींचं भाषण ऐकून मला कारखाना चालू करावासा वाटतो आहे पण मी ते धाडस करणार नाही. असंही उद्धव ठाकरे आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले.

साखरेमधला गोडवा पवार यांनी कार्यक्रमात आणला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. या साखर परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या विस्तार अन्य ठिकाणीही करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात सुरू करणार असं आश्वासन शरद पवारांनी नितीन गडकरींना दिलं.