TOD Marathi

औरंगाबाद : औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी घोषणा करतील असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र दुसऱ्याच्या दिवशी भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी खैरेंच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही, असं कराड यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना कराड म्हणाले की, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नसून, काही जण केवळ हवेत बाता मारत आहेत.

कोणत्याही शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव आधी राज्य विधानसभेत मंजूर करून केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागतो. कारण, शहराचे नाव बदलायचे असेल, तर त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते आदी -खात्यांची ना हरकत लागते. परंतु माझ्या माहितीनुसार राज्य सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही, असं खैरे यांनी यावेळेस सांगितलं.