टिओडी मराठी, यवतमाळ, दि. 11 जुलै 2021 – नांदेड जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी 8.33 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर इथं असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे.
मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांत भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नाहीत, असे नागरिकांनी सांगितले. तसेच कोणतीही हानी झालेली नाही.
महागाव तहसिलदार आणि त्यांची चमू यांनी गावांमध्ये भेट दिली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडोना व साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले आहे. त्याची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे.
मात्र, आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत, असे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले आहे. केंद्रबिंदूच्या गावांत त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली आहे.
आजूबाजूच्या १० किलोमीटरच्या परिसरातील गावांत पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवलेले नाहीत, अशी माहितीही दिली. तसेच जीवित आणि वित्तहानी झालेली नाही, असे इसळकर यांनी सांगितले आहे.
तरीही आमची चमू दिवसभर काही घडामोडी झाल्यास परिस्थिती हाताळण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, असे उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी सांगितले आहे.