TOD Marathi

टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर हजारो लोक देशातून पलायन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरणार्थींचा प्रश्न समोर येत आहे. आता तुर्कीने शरणार्थींना देशामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी काम सुरु केलंय. इराणला लागून असलेल्या सीमेवर तुर्कीकडून भिंत उभारण्यात येत आहे. तुर्कीने त्यांच्या इराणला लागून असलेल्या सीमेवर सुमारे 295 किलोमीटर लांब भिंत उभारण्याचं ध्येय ठेवलं आहे. सध्या याचे केवळ 5 किलोमीटर काम उरलं आहे. अगोदरपासूनच लाखो शरणार्थी तुर्कीमध्ये राहत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या हिंसाचारानंतर काबुल विमानतळावरून उड्डाणांसाठी तुर्की तयार आहे. परदेशी सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर विमानतळाची सुऱक्षा करू, असेही तुर्कीने म्हटलं आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी अगोदर म्हटलं होतं की, तालिबानच्या वाढत्या वर्चस्वावर लक्ष आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हालचाली वाढल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी अनेक देशांत आश्रय घेतलाय. काही अफगाण नागरीक पळून तुर्कीत पोहोचलेत. संयुक्त राष्ट्रानेसुद्धा याबाबत चिंता व्यक्त केलीय. संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानच्या नागरिकांना वाचवण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी तालिबान आणि इतर सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन केलं आहे.

याबाबत संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्र यावर शांततेने तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व अफगाण नागरिक, विशेषत: महिला, मुलींच्या मानवाधिकारांचे संरक्षण करण्यास आणि गरजू नागरिकांना आवश्यक मदत करण्याचा संकल्प संयुक्त राष्ट्राने केलाय.