TOD Marathi

टिओडी मराठी, काबूल, 29 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तानातील लोकसंगीताचे गायक फवाद आंद्रबी यांची हत्या केलीय. अफगाणमधील सीमा भागातील डोंगराळ प्रदेशामध्ये ही हत्या झाल्याचे आंद्रबी यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

तालिबानकडून संगीत, कला क्षेत्राची गळचेपी केली जात आहे, हे स्पष्ट झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी काबूलपासून 100 किलोमीटर अंतरावरील बागलान प्रांतातील आंद्रबी व्हॅलीमध्येच ही हत्या झाली आहे. या भागाच्याच नावावरून फवाद यांचे नामकरण केले होते.

आंद्रबी व्हॅलीमधील काही जिल्हे सशस्त्र गटांच्या नियंत्रणाखाली आहेत. या गटांनी तालिबानच्या राजवटीला सशस्त्र विरोध केला होता. या क्षेत्रातील बहुतेक भाग परत मिळवल्याचे तालिबानने म्हटले आहे. मात्र या भागातील हिंदु कुश पर्वताचा काही भाग अजूनही तालिबानच्या आधिपत्याखाली आला नाही.

तालिबानने काही दिवसांपूर्वी आंद्रब यांच्या घरी भेट घेतली होती.आंद्रबी यांच्या घरी तालिबान्यांनी चहापाणी केले होते, असे आंद्रबी यांचे पुत्र जवाद आंद्रबी यांनी सांगितले. मात्र, शुक्रवार परिस्थिती अचानक बदलली. आंद्रबी यांना एका शेतात डोक्‍यात गोळी मारून ठार केले, असेही जवाद आंद्रबी म्हणाले. आंद्रबी हे एक सामान्य लोककलाकार होते. त्यांच्या हत्येला न्याय मिळायला पाहिजे, असे ते म्हणाले.