TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 18 जून 2021 – कोरोनामुळे आता विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘ट्विटर’द्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यामुळे फी भरल्याशिवाय दाखल मिळणार नाही, असे म्हणणाऱ्या आणि दाखल्यासाठी अडवणूक करणाऱ्यांना हि मोठी चपराक आहे, असे समजत आहे.

शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी त्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

कोरोना काळात मुलांची फी भरणे पालकांना कठीण झाले. त्यामुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला काही शाळा नाकारत आहेत, असे कळते.

दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय आणि अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात आहे. ही कृती शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारी आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा ‘शाळा सोडल्याचा दाखला’ उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन पुढील कार्यवाही करावी. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केलाय, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

…तर मुख्याध्यापकांवर होणार कारवाई
विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला’ अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक/शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील आणि कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.