TOD Marathi

दोन वर्षांनी होत असलेल्या निर्बंधमुक्त नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple Kolhapur) जय्यत तयारी करण्यात आली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेत प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नियोजन सुरु आहे. 

दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) नवरात्रोत्सव काळात सुरक्षेसह वाहतूक मार्गात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक तसेच अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरामध्ये 11 ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल.  पोलिसांकडून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री आठ ते सकाळी 10 यावेळेत मंदिर परिसरात 5 ऑक्टोबरपर्यंत वाढीव बंदी घालण्यात आली आहे.

सीपीआर चौक, सोन्या मारुती चौक, तोरस्कर चौक, गायकवाड बंगला, गंगावेश, रंकाळा स्टँड, तटाकडील तालीम, तांबट कमान, जुना वाशी नाका, देवकर पाणंद पेट्रोल पंप चौक, इंदिरा सागर चौक, रेसकोर्स नाका, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, दसरा चौक या परिसरातून अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना रात्री 8 ते सकाळी 10 पर्यंत वाढीव बंदी केली आहे.

महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी असेल. दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी हा मार्ग खुला असला, तरीही गर्दी झाल्यास हा मार्ग बंद करण्यात येईल. बिंदू चौक ते वणकुंद्रे भांडी दुकान ते पापाची तिकटी, भेंडे गल्ली रोड हा नेहमीप्रमाणे एकेरी राहील. केएमटी बसेस छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणार नाहीत.

कोल्हापूरमध्ये दुर्गा दर्शनासाठी केएमटीकडून पास देण्यात येतो. या सेवेचीही सुरुवात करण्यात आली आहे.  या पासमुळे अल्प किंमतीमध्ये दुर्गा दर्शनाचा लाभ शहरवासियांसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना घेता येईल.